रात्रीचे कार्यक्रम

भजन : जयजय राम राम राम । सीताराम राम राम ।।

रामा हो जय रामा हो ।पतीतपावन पूर्णकामा हो ।। ध्रु. ।। नाथा हो दिननाथा हो ।तुझिया चरणी राहो माथा हो ।। १ ।। बंधू हो दिनबंधू हो ।रामदास म्हणे कृपासिंधू हो ।। २ ।। रामा हो जय रामा हो ।पतीतपावन पूर्णकामा हो ।। ध्रु. ।।

भजन

रामदास गुरु माझे आई। मजला ठाव द्यावा पायी ।।

अभंग

राम गावा राम ध्यावा । राम जीवीचा विसावा ।। १ ।। कल्याणाचे जे कल्याण। रघुरायाचें गुणगान ।। २ ।। मंगलाचें जे मंगल। राम कौसल्येचा बाळ ।। ३ ।। राम कैवल्याचा दानी रामदास अभिमानी ।। ।।४ ।।

भजन

रघुपती राघव राजाराम । पतीतपावन सीताराम ।।

अभंग

रत्जडित सिंहासन । वरि शोभे रघुनंदन ।। १।। वामांकी ते सीताबाई । जगज्जननी माझी आई ।। २ ।। पश्चात भागी लक्ष्मण पुढे अंजनीनंदन ।। ३।। भरत-शत्रुघ्न भाई। चवन्ऱ्या काळिती दोन्ही बाही ।। ४ ।। नळनील जांबूवंत । अंगंद सुग्रीव बिभिषण भक्त ।।५।। देहबुद्धी नेणो काही । दास अंकित रामापायी ।। ६।।

भजन

रामकृष्ण हरी जयजय रामकृष्ण हरी ।।

यापुढे सात वारांचे अभंग व भजने खाली दिली आहेत. ती ज्या त्या वारी म्हणावी. आरतीचे अवकाशाप्रमाणे आणखी दुसरेही संताचे अभंग अगर पदे वाराचा अभंग म्हणून झाल्यावर श्रीसमर्थांचे पद म्हणावे.

रविवार

धन्य सूर्यवंश पुण्य परायण। सर्वही सगुण समुदाय ।। १।। समुदाय काय सांगो श्रीरामाचा । अंतरी कामाचा लेश नाही ।। २।। लेश नाही तया बंधु भरतासी । सर्वही राज्यासी त्यागियेले ।। ३।। त्यागियले अन्न केले उपोषण । धन्य लक्ष्मण ब्रह्मचारी ।। ४।। ब्रह्मचारी धन्य मारुती सेवक । श्रीरामी सार्थक जन्म केला ।। ५॥ जन्म केला धन्य वाल्मिक ऋषीने । धन्य ती वचने भविष्याची ।।६।। भविष्य पाहता धन्य बिभिषण । राघवी शरण सर्व भावे ।।७।। सर्वभावे सर्व शरण वानर । धन्य ते अवतार विबुधांचे ।। ८ ।। विबुध मंडण राम सर्व गुण अनन्य शरण रामदास ।। ९ ।।

भजन

रामा हो रामा।

सोमवार

दंड डमरु मंडित पिनाक पाणी ।। धृ ।। पांच मुखे पंधरा डोळे । गळा साजुक सिसाळे ।। १ ।। हिमालयाचा जामात । हाती शोभे सरळ गात ।। २।। मस्तकी वाहे गंगाजळ । कंठी शोभे हळाहळ ।। ३।। माथा शोभे जटाभार । अंगी फूंकती विखार ।। ४ ।। रामी रामदास स्वामी । चिंतितसे अंतर्यामी ।। ५ ।।

भजन

शिवहार सांब शिवहार सांब ।। शिवहर शंकर शिव शिवसांब ।।

मंगळवार

सदा आनंद भरीत । रंग साहित्य संगीत

जगन्माता जगदेश्वरी । जगज्जननी जगदीव्दारी ।। २।।

त्रिभुवनीची वनिता । बाळ तारुण्य समस्तां ।। ३।।

वसें आकाशी पाताळी । सर्व काळ तिन्ही काळी

जिच्या वैभवाचे लोक । हरिहर ब्रह्मादीक

सर्व देहा हालविते । चालविते बोलविते

मूळ माया विस्तारली । सिध्द साधकाची बोली

भक्ती मुक्ति योग स्थिती। आदी मुक्ती सहज स्थिती ।। ८ ।।

मुळी राम वरदायिनी । रामदास ध्यातो ध्यानी

भजन

रामाबाई माझे आई करुणा तुलायेऊ देई ।।

बुधवार

येथे उभा का श्रीरामा । मन मोहन मेघःशामा

काय केली सिताबाई । येथे राही रखुमाबाई

काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी

काय केली शरयु गंगा । येथे आणली चंद्रभागा

धनुष्य बाण काय केले । कर कटावरी ठेविले

काय केलें वानर दळ । येथे मिळविले गोपाळ

रामी रामदासी भाव । तैसा होय पंढरी राव

भजन

पाण्डुरंग हरी । जयजय पाण्डुरंग हरी ।।

गुरुवार

१ अभंग

आदीनारायण सद्‌गुरु आमुचा । शिष्य झाला त्याचा महाविष्णु ।। १ ।।

तयाचा शिष्य तो जाणावा हंस । तेणे ब्रह्मयास उपदेशिले ।। २।।

ब्रह्मदेवा केला उपदेश वसिष्ठा । तेंथे धरा निष्ठा शुध्द भावो ।। ३ ।।

वसिष्ठ उपदेशी श्री रामरायाशी । रामे रामदासी उपदेशिले ।। ४ ।।

२ भजन

उपदेश देखोनि दिधला मारुती स्वयें रघुपति मिरविता ।। १ ।।

निरवितां तेणे झालो रामदास। संसारी उदास म्हणोनिया ।। २।।

म्हणोनी आमुचे कुळी कुळदैवत । राम हनुमंत आत्मरुपी ।। ३ ।।

आत्मरुपी झाला रामी रामदास । केला उपदेश दिनोध्दारा ।।४।।

३ भजन

भाविका भजना गुरु परंपरा । सदा जप करा राम मंत्र ।।१।।

राममंत्र जाणा त्रयोदशाक्षरी । सर्व वेद शास्त्री प्रकटची ।। २।।

प्रकटची राममंत्र हा प्रसिध्द । तारीतसे बध्द जडजिवा ।।३।।

जडजिवा तारी सकळ चराचरी । देह काशिपुरी येणे मंत्रे ।। ४ ।।

येणे मंत्रे जाणा बध्द तो मुमुक्षु । साधक प्रसिध्द सिध्द होय ।। ५ ।।

सिध्द होय राम तारक जपता । मुक्ति सायुज्यता रामदासी ।। ६ ।।

भजन

नारायण विधी वसिष्ठ राम । रामदास कल्याण धाम

शुक्रवार

अभंग

काहो रामराये दुरी धरियले। कठीण कैसे झाले चित्त तुझे ।। १ ।।

देऊनी आलिंगन प्रिती पडीभरे । मुख पितांबर पुसशिल ।। २।।

घेऊनी कडिये धरुनी हनुवठी। कई गुजगोष्टी सांगशिल ।। ३ ।।

रामदास म्हणे केव्हा संबोखिशी । प्रेमे पान्हा देशी जननिये ।। ४ ।

भजन

तू माय मी लेकरु । राघवा नको विसरु नको विसरु ।

शनिवार

अभंग

स्वामी माझा ब्रह्मचारी । माते सारी अवघ्या नारी ।। १।। उपजतांची बाळपणी । गिळू पाहे वासरमणी ।। २।। अंगी सिंदुराची उटी । जया सोन्याची कासोटी ।। ३।। रामकृपेची साऊली रामदासाची माऊली ।। ४ ।।

भजन

सिताशोक विनाशन चंद्रा । जय बलभिमा महारुद्रा ।।

श्री समर्थांचे पद

हनुमान नमिला मी मज पावविले रामी ।। विघ्नाचिया कोटी शमी अंतराय ।। १।। रामउपासकावरी । प्रीति बहुतचि करी ।। होऊनिया कैवारी रक्षीतसे ।। २ ।। रामी रामदासी श्रेष्ठ । निजध्यासे वरिष्ठ ।। भवाचा मी भरिला घोट स्मरण मात्रे ।। ३।।

भजन

रामलक्षुमण जानकी । जय बोलो हनुमानकी ।।

महाव्दार बंद करावे.

पुढील पद हे श्री सखारामबोवा यांनी केले आहे.

आनंदरस मी प्याला । भवताप शांतचि झाला ।। ध्रु ।। अनंतकोटी कल्मषपाश पावे एका समयी नाश ।। दृढधरिता सद्‌गुरुची कास ।। निजगुज सांगुनी गेला ।। आनंद ।। १।। आता मजहो कैचे ध्यान ।। निरसूनि गेले समुळही भान ।। श्रवण कराया नाही मनकान ।। संकल्पचि नीमाला ।। आनंद ।। २ ।। मेली अद्यती मोहमाय ।। केला जीणे दृढ व्यवसाय । रामसखा तो शोकेल काय ।। चिन्मय होऊनि ठेला ।। आनंद ।। ३ ।।

रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी ।।

भजन

चिदघनगुरुमाउली करी कृपेची साउली ।। सखाराम गुरु माउली ।। करी कृपेची साउली । रामकृष्ण गुरुमाउली ।। करी कृपेची साउली । गोविंदराज माउली । करि गुरुकृपेची साउली ।। रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी ।

आम्ही अपराधी अपराधी आम्हा नाही दृढ बुध्दी ।। १। आमुचे अपराध अगणित कोण करील गणित ।। २ ।। मज सर्वस्वी पाळावे प्रचितीने सांभाळावे ।। ३।। माझी वाईट करणी रामदास लोटांगणी ।। ४।।

हा अभंग म्हणून सखाराम सीताराम भजन गोलाकार फिरत राहून नंतर पुढील अभंग म्हणावा.

महाव्दार उघडावे

अभंग

अजि करुनी आरती । चक्रपाणी ओवाळिती

अजि करुनि नवस । धन्यकाळ हा दिवस ।। २।।

पहा पहाहो सकळ । पुण्यवंत तुम्ही व्हाल

तुका बाहे टाळी । उभा संनिध जवळी

आरत्या

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।। सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची। कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।।१।। जयदेव जयदेव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मनकामना पूर्ति ।। ।। लंबोदर पितांबर फणिवर बंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।। दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।।२।। जयदेव जयदेव जय मंगलमूर्ति । दर्शनमात्रे मनकामना पूर्ति ॥ छु ।

2

साफल्य निजवल्या कौसल्या माता । भूकन्या आनस्या मुनिमान्या सीता । खेचर वनचर फणीवर भर्ता निजभ्राता। दशरथ नृपनायक धन्य तो पिता ॥ १।। जयदेव जयदेव जयरघुकुलटिलका। आरती ओवाळू त्रिभुवननायका ।। ध्रु ।। आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ । रविकुळमंडण खंडण संसारमूळ ।। सुरवर मुनिवरकिन्नर ध्याती सकळ । धन्य तो निजदास भक्त प्रेमळ ।। जयदेव जयदेव जयरघुकुलटिलका । आरती ओवाळू त्रिभुवननायका ।। ध्रु ।।

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी । कडाडले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी । सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। १।। जयदेव जयदेव जय हनुमंता तुमचे नि प्रसादे न भिवो कृतान्ता ।। ध्रु ।। दुमदुमली पाताळे उठला प्रतिशब्द । थरथरला धरणीधर मानिला खेद । कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद । रामी रामदासा शक्तीचा शोध ।। जयदेव जयदेव जय हनुमंता तुमचे नि प्रसादे न भिवो कृतान्ता ।। २।।

सुखसहिता दुखरहिता निर्मल एकांता । कलिमलदहना गहना स्वामी समर्था ।। न कळे ब्रह्मादिक अंता अनंता । तो तू आम्हा सुलभ जय कृपावंता ।। १।। जयदेव जयदेव जय करुणाकरा ।। आरती ओवाळू सद्‌गुरु माहेरा ।। ध्रु ।। मायेविण माहेर विश्रांतीचा ठाव । शब्दी अर्थलाघव बोलणी वाव ।। सद्‌गुरुप्रसादे सुलभ उपाव । रामी रामदासा फळला सद्भाव ।। जयदेव जयदेव जय करुणाकरा ।। आरती ओवाळू सद्‌गुरु माहेरा ।। २ ।।

भावाभावरहित वस्तुमार्ग दाविसी ।। नवविधभक्ततीपंथे स्वानुभवा देशी ।। विषयेच्छु असतां कर्ममोक्षेच्छु करिसी ।। अनन्य पाहुनी शिष्या उपासना देशी ।।१।। जयजय आरती सद्गुरु श्रीरामकृष्णा ।। स्वसुखा देऊनी निरसी तापत्रयतृष्णा ॥ ध्रु ।। आवणादि संशय निरसुनि शिष्याचे ।। उदासिन साक्षित्व अप्रतिहत साचे ।। ज्ञातृ त्रयादि निरसुनि सुबोध दे याचे ।। अनन्य गोविंदाचे नेले भ्रमातें ।। जयजय आरती सद्‌गुरु श्रीरामकृष्णा ।। स्वसुखा देऊनी निरसी तापत्रयतृष्णा ।। ध्रु ।।

सप्तऋषि क्षेत्री अवतार धरुनि ।। प्रातः स्नान संध्यारामार्चन भजनी ।। अतीत अभ्यागत पूजन करुनी सहज स्वरुपी विलसे निज सदनी ।। जयदेव जयदेव जयगुरुनाथा ।। सदभावे चरणी ठेविला माथा ।। ध्रु ।। संस्कृत प्राकृत ग्रंथपठण ।। भागवत रामायण निष्ठा परिपूर्ण ।। परमामृत दासबोध रात्री कीर्तन ।। उन्मनी अवस्थे सहजनिमग्न ।। २।। जयदेव ।। साधुसंत येती बहु तोषविले । शरणागत मुमुक्षु भजना लावीले ।। उपासना कर्म विध्युक्त केले ऐशिया स्थितीने भवसिंधू तरले ।। ३।। जयदेव ।। तुरीय आश्रम धारण केला ।। सत्कीर्ती सद्बोध ध्वज उभारीला ब्रह्मस्वरुपी ऐक्य जाहला ।। नरहरीदास त्याचे वंदी चरणाला ।। जय ।। ४ ।।

ब्रह्माविष्णुहरादिक मानसी ध्याती ।। दयाळा मानसी ध्याती ।। सुरवर मुनिवर नारद तुंबर किर्तनी गाती ।। आगमनिगम शेष स्तविता मंदली मती ।। दयाळा मंदली मती ।। तो तू आम्हा पूर्णकामा मानवाप्रती ।। १।। राम जय जय जय जय आरती सद्‌गुरुस्वामी समर्था ।। दयाळा स्वामी समर्था ।। कायावाचा मनोभावे ओवाळीन आता ।। ध्रु ॥ ऋषिवर मुनिवर किन्नर देवा तुझे स्थापिले ।। दयाळा षड्‌दर्शने मत्त गुमाने पंथा चालिले ।। अपरंपार परात्परी पार न कळे दयाळा पार न कळे ।। पतितप्राणी पदा लागुनी कल्याण झाले।। राम जय जय जय जय आरती सद्‌गुरुस्वामी समर्था ।। दयाळा स्वामी समर्था ।। कायावाचा मनोभावे ओवाळीन आता ।। ध्रु ।।

वेदांतसंमतीचा काव्यसिंधु भरला ।। श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता । शास्त्रसंगम झाला ।। महानुभाव संत जनी अनुभव चाखिला ।। अज्ञान जडजीवा मार्ग सुलभ झाला ।। १।। जयजया दासबोधा ।। ग्रथराज प्रसिध्दा ।। आरती ओवाळींन ।। विमलज्ञान बालबोधा ।। जयजया दासबोधा ।। धृ. ।। नवविधा भक्तिपंथे रामरुप अनुभवी ।। चातुर्यनिधी मोठा मायाचक्र उगवी ।। हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी ।। बध्दचि सिध्द झाले असंख्यात मानवी ।। जय जय. ।। २ ।। वीसही दशकीचा ।। अनुभव जो पाहे ।। नित्य नेमे विवरिता ।। स्वयें ब्रह्मची होये ।। अपारपुण्यागाठी ।। तरी श्रवण लाहे ।। कल्याण लेखकाचे भाव-गर्भ हृदयी ।। जयजया दासबोधा ।। ३।।

कलियुगी साचार प्रगट दत्तमूर्ती । अवतार व्दिभूज तू सुष्ट जना पाळिती ।। १।। आरती स्वामिराजा ।। शुध्द बोध स्वरुपा अज्ञान। निरसुनी ।। दीना विज्ञान देसी ।। आरती स्वामिराजा ।। धृ.।। दुष्टजनबुध्दिहर्ता ।। निजानंद सुखराशी ।। नाना खेळखेळूनिया दीन जनासि देशी ।। आरती ।। ३ ।। अक्कलकोटामाजी ।। रम्य देव गुरुदेव ऐक्य रुपा राहुनिया ।। इच्छानिच्छा फळ देशी ।। आरती ।। रामकृष्ण चिद्धनाची ।। लीलामूर्ती पाहुनिया निजरुपी स्थिर झाला ऐसे सर्वजन होती ।। आरती स्वामिराजा ।। ४।।

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुध्यात्मनावानुसृतस्वभावात् ।। करोती यद्यत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत्त । १।। अच्युत केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि ।। श्रीधर माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजें ।। २।। हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।। ३।।

पुंडलीक वरदे हरी विठ्ठल । पार्वतीपते हरहर महादेव ।।

सीताकांत स्मरण जयजयराम ।।

राजाधिराज रामचंद्र महाराजकी जय ।

गोपाळकृष्णमहाराजकी जय ।।

शुकाचार्य महाराजकी जय ।।

समर्थ रामदासस्वामी महाराजकी जय ।।

सद्‌गुरुनाथ महाराजकी जय ।।

राघवेंद्रस्वामी महाराजकी जय ।

सखाराम महाराज की जय ।

चितघनस्वामी महाराजकी जय ।।

रामकृष्ण महाराजकी जय ।

सद्गुरु गोविंदराज महाराजकी जय ।

महारुद्र हनुमानकी जय ।

हरयेनमः ।। हरयेनमः ।। हरयेनमः ।।

रामदास कल्याण जगन्नाथ महाराजकी जय ।। ।।

श्री मारुती चे भोवती पाच प्रदक्षिणा करणे त्यावेळचे पद पुढीलप्रमाणे

पद

धन्य हे प्रदक्षिणा सद्‌गुरुरायाची ।। झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ।। धन्य हे ।। धृ.।। गुरुभजनाचा महिमा अपार न कळे निगमागमासी ।। अनुभवी ते जाणती जें कां गुरु पदीचे अभिलाषी ।। धन्यः ।। १।। पदोपदी झाल्या अपार पुण्याच्या राशी ।। सकळही तीर्थे घडली आम्हा आदी करुनी काशी ।। धन्य हे ।। २।। कोटी ब्रम्हहत्या हरती करीता दंडवत ।। लोटांगण घालीता मोक्ष लागे पायास ।। धन्य हे ।। ३ ।। मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती ।। नामसंकीर्तने ब्रम्हानंदे गर्जताती ।। धन्य ।। ४ ।। करुनी प्रदक्षिणा देह अहंभाव वाहिला ।। श्रीरंगात्मज निजा नंदी सन्मुख उभा राहीला ।। धन्य हे प्रदक्षिणा सद्‌गुरुरायाची ।। झाली त्वरा सुरवरां विमान उतरावयाची ।। ५।।

भजन

गुरुराज माऊली । गुरुराज माऊली ।।

प्रदक्षिणा झाल्यावर मंत्रपुष्प, नंतर कीर्तनास प्रारंभ करावा. कीर्तनाचे शेवटी समर्थांचे अष्टक (कली युगे तीन चरण) व समर्थांची गोष्ट सांगण्याची परंपरा आहे.

कीर्तनानंतर रामाची, मारुतीची, सद्‌गुरुची व सखाराम महाराजांची आरती म्हणावी.

लळिताचे कार्यक्रम

रत्नजडित सिंहासन,

द्यावा प्रसाद सद्‌गुरु, महाप्रसाद ताटीचा

हे अभंग व समर्थांची गोष्ट झाल्यावर आशीर्वचन, आरती व प्रसाद