|| श्रीराम समर्थ ||

उत्सव पद्धतीच्या चौथ्या आवृत्तीचे संकलन श्री. रविंद्र वसंत आठवले यांनी केले असुन मुख्यत्वेकरून नागाव येथील दासनवमी उत्सवाच्या अनुषंगाने सदर पुस्तिकेची मांडणी करण्यात आली आहे. सदर उत्सव पध्दतीच्या पुस्तीकेस आता वेबसाईट वर प्रस्तूत करण्यात येत आहे

प्रस्तावना

संकल्पाचा दाता श्रीराम जो जगत् नियंता परमेश्वर ज्याच्या सत्तेवाचून झाडाचे साधे पानही हालत नाही त्याच्याच कृपेने ही उत्सव पध्दतीची चौथी आवृत्ती छापण्यात आली आहे.

यापूर्वी ४ ऑक्टोबर १९७७ शके १८९९ भाद्रपद वद्य ७ रोजी तिसरी आवृत्ती छापली होती त्याला सुमारे २५ वर्षे झाली. आवृत्ती छापण्यासाठी परिश्रम घेतलेल्या अनेकांपैकी लेखक कै. गु, वासुनाना परांजपे, तसेच संशोधक परमपूज्य ती. बापूबोवा व आर्यभूषण छापखान्यातील अनेकांनी मेहनत घेतली होती त्यांचे ऋण निर्देश करणे योग्य ठरेल.

पूर्विच्या आवृत्ती आता उपलब्ध नसल्याने परम पुज्य श्री चित्घनस्वामी सखारामबोवा यांच्या महान स्मृतींचा ठेवा जतन करण्यासाठी आणि कालानुरुप आजच्या पिढीला पाठांतराची सवय नसल्याने नवीन सुबध्द असे पुस्तक असावे असा मनात विचार आला व तो प्रथम आमचे कुटुंबीयांचे समोर मांडला. त्यांनी त्वरीत कामाला सुरवात करण्यास सांगितले. पूर्विच्या पुस्तकात नागांव व कवाड येथे म्हणावयाचे श्लोक व आरत्या यामध्ये थोडासा फरक आहे. म्हणून त्यात बदल करुन नागांव येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे जेथे गरज आहे तेथे सुचनात्मक आखणी केली. त्यासाठी आमचे काका श्री. केशव सिताराम आठवले यांची बहुमोल मदत झाली. हे सर्व छापण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले त्यात श्री पांढरा मारुती संस्थान नागांव येथील पंच कमिटी, संगणकावर प्रत तयार करणारे ठाणे येथील श्री प्रकाश ठाणेकर तसेच मुखपृष्ठ बनविण्यासाठी मेहनत घेतली ते श्री अजित वसंत आठवले व मोनाली प्रिंटर्सचे संबधीत सर्वजण यांना धन्यवाद देऊन माझे मनोगत पूर्ण करतो. या व्यतिरिक्त ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा उल्लेख झाला नसल्यास क्षमस्व.

दि. १६ फेब्रुवारी २००२

माघ शुद्ध चतुर्थी (गणेश जन्म) शके

संकलक,

रविंद्र वसंत आठवले

डोंबिवली